आज सिंहगड नावाने ओळखला जाणारा किल्ला म्हणजेच कोंढाणा किल्ला होय. सिंहगडाचे आधीचे नाव कोंढाणा होते.
पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता.
शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या सहकार्यांनी हा किल्ला जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला' हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंढाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.
गडावरील ठिकाणे
कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.
उदेभानाचे स्मारक : हे दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर आहे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.
डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.
तानाजीचे स्मारक : अमृतेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस तानाजीचे स्मारक आहे. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.