तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी आणि महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले होते. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढला.
स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.
पुण्याजवळील सिहंगडावर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे तसेच रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आलेले आहे.
संदर्भदुवे
१. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठी संकेतस्थळावरील तानाजी मालुसरे यांचा जीवनपट